Tuesday, October 18, 2016

वाचण्याची इच्छाच नसणं हे अत्यंत घातक ! (स्वप्नील जोगी)

वाचण्याची इच्छाच नसणं हे अत्यंत घातक ! (स्वप्नील जोगी)
16 ऑक्टोबर 2016 - 03:00 AM IST
ॲलन गिबन्स, वयाच्या त्रेसष्टीत असणारं एक बहुपेडी व्यक्तिमत्त्व. महत्त्वाचं म्हणजे एका शेतमजुराचा मुलगा ! वयाच्या तिशीत असताना ब्रिटनमधल्या कुठल्याशा प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम करताना गिबन्स यांना त्यांच्यात दडलेल्या लेखकाची पहिल्यांदाच जाणीव झाली आणि मग पुढं बाल-कुमारांसाठीचं साहित्य लिहिणारे लेखक अशी त्यांची ठळक ओळख निर्माण झाली. नंतर त्यांना त्यांच्यातला शिक्षक स्वस्थ बसू देईना. मग ते ‘एज्युकेशनल काउन्सिलर’ म्हणून जगभर व्याख्यानं देऊ लागले. या व्याख्यानांचा प्रमुख मुद्दा असतो ‘मुलांचं शिक्षण आनंददायी कसं व्हावं’ हा. काही प्रयोगशील पद्धती ते या व्याख्यानांतून श्रोत्यांपुढे मांडतात. नुकतेच ते पुण्यात येऊन गेले. त्यांचे वेगवेगळे पैलू उलगडणारी ही मुलाखत...
प्रश्‍न : एकीकडं शिक्षक, दुसरीकडं एक लेखक आणि आता एक एज्युकेशन काउन्सिलर... एकाच वेळी अशा तिन्ही क्षेत्रांत तुम्ही सहज वावरता...कसं शक्‍य होतं हे ? तुम्हाला यात काही समान धागा दिसतो का ?
उत्तर : अगदीच ! समान धागा अगदीच दिसतो मला. खरं सांगायचं तर मला या तिन्ही गोष्टी एकमेकांशी घट्ट जोडलेल्या असल्यासारख्याच वाटतात. मला सांगा, आपल्या सगळ्यांना जोडून ठेवणाऱ्या गोष्टी कोणत्या... ? परस्पर संवाद, एकमेकांविषयीची सहानुभूती आणि माणूस म्हणून असायला हवी असलेली सहवेदनाच, याच ना ? मग एक शिक्षक काय आणि एक लेखक काय दोघंही कळत-नकळत हेच तर करत असतात. किंबहुना त्यांनी तसंच करणं अपेक्षित आहे. त्यातही लेखनाच्या बाबतीत हे अधिक लागू होतं. चांगलं लिहिलं जाणाऱ्या आणि चांगलं वाचलं जाणाऱ्या समाज व्यवस्था शांतताप्रिय, आनंदी आणि अधिक सम्यक असतात. सर्वसमावेशक असतात, हे दिसूनही येतंच. या प्रश्‍नाचं उत्तर देताना एक पाऊल पुढं जात मी हेही आवर्जून सांगेन, की साहित्य हे तुम्हाला जगताभिमुख करणाऱ्या, तुम्हाला जगाची ओळख करून देणाऱ्या एखाद्या खिडकीसारखं आहे आणि ही खिडकी बऱ्याचशा प्रमाणात लोकशाहीवादी आहे. तुम्हाला माणूस म्हणून समृद्ध करणारा तो मार्गही आहे.
एज्युकेशनल काउन्सिलर असलेले ॲलन गिबन्स नुकतेच पुण्यात येऊन गेले, त्या वेळी ते एका प्रसन्न मुद्रेत. 
(छाया - स्वप्नील जोगी)
प्रश्‍न : कामानिमित्त तुम्ही विविध देशांना भेटी देत असता, विशेषतः तुम्ही पश्‍चिम आशियात आणि विकसनशील देशांत जाणीवपूर्वक जात असता. या देशांपुढं असणारी शिक्षणाची आव्हानं, तिथल्या सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थितीचा त्यावर होणारा परिणाम, तिथली वाचन संस्कृती याविषयीची तुमची निरीक्षणे ?उत्तर : हाती येणारं उत्पन्न कमी आणि त्यामुळे सुस्थितीचा अभाव (जी अनेक विकसनशील आणि बहुतेक सगळ्याच अविकसित देशांची स्थिती आहे) हे जाणवल्याशिवाय राहत नाही. अर्थातच चांगलं जगण्यासाठी, तसंच चांगलं साहित्य वाचता येण्यासाठी जी पूर्वपीठिका असावी लागते. तिच्यावर तिथं मर्यादा असल्याचं ध्यानात येतं; मात्र, असा प्रश्‍न (विशेषतः वाचनासंबंधी) अगदी आमच्या ब्रिटनमध्येसुद्धा आहेच. आज ब्रिटनमधली ४० लाख मुलं वाचनापासून वंचित आहेत. आफ्रिकेसारख्या देशात ही परिस्थिती अधिकाधिक टोकाची होत जाताना दिसते. जगण्यासाठी आवश्‍यक शिक्षण, पुस्तकांची उपलब्धता, इतकंच नव्हे, तर संगणकांसारख्या साधनांची उपलब्धता, अशी अनेक आघाड्यांवरची लढाई आज सर्वत्रच पुढ्यात येऊन ठाकली आहे.
दुसरीकडं, दहशतवादाचा प्रश्‍नही मूळ धरून आहेच. ‘इस्लामिक स्टेट’सारख्या दहशतवादी संघटनांकडे तरुणपिढी मोठ्या प्रमाणावर वळू पाहतेय. ही मानसिकता बदलण्यासाठी लेखणीचं योगदान प्रभावी ठरू शकतं. त्यातून काही प्रश्‍न उपस्थित करून त्यांचे मनपरिवर्तन घडवून आणता येऊ शकतं. याशिवाय मी आणखी एक महत्त्वाची गोष्ट मी सांगेन व ती म्हणजे मुलांच्या वाचनाची. मुलींच्या तुलनेत मुलं अतिशय कमी वाचतात आणि हे माझं निरीक्षण मी अनेक देशांत केलेल्या फिरस्तीनंतर मांडतोय. त्यामुळे मुलांचा वाचनाकडे ओढा वाढवणे हेही उद्दिष्ट असायला हवं.
प्रश्‍न : आपल्या आत्ताच्या भारतभेटीबद्दल काही सांगा...
उत्तर : ब्रिटिश कौन्सिलच्या आमंत्रणावरून मी आठवडाभर भारतात आलोय. इकडच्या वेगवेगळ्या राज्यांत, तिथल्या शहरी अन्‌ ग्रामीण भागांत भेटी देत काही शाळांतल्या विद्यार्थ्यांना मला भेटता आले. त्यांनी कोणतं आणि कुठल्या प्रकारचं साहित्य वाचावं, ते कसं वाचावं, वाचन ते लेखन हा प्रवास कसा असतो, मुलांची आकलन क्षमता वाढविण्यात शिक्षकांचं योगदान कसं असू शकेल, अशा बऱ्याच विषयांवर मी इथल्या शाळांमध्ये बोललो. एकेकदा तर तीनशे तीनशे विद्यार्थीही माझ्यापुढं असायचे. हा अनुभव मलाही खूप काही नवं शिकवून जाणारा होता. इथं एक निरीक्षण मी आवर्जून नोंदवेन व ते म्हणजे भारतातल्या मुलांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेविषयीचं ! त्यांची ग्रहण क्षमता आणि जे काही समजलंय-उमजलंय ते ’रिप्रोड्यूस’ करण्याची क्षमता थक्क करणारीच आहे.
प्रश्‍न : वाचनाबाबत तुम्ही नेहमी दोन प्रकारच्या गरिबीबद्दल, दारिद्रयाबद्दल बोलत असता, त्याविषयी सांगाल ?उत्तर : वाचन संस्कृतीपुढं असणारं हेही मोठं आव्हान आहे. पहिलं आहे, ते आर्थिक गरिबीमुळं आपोआपच उभी राहणारी साधनांच्या मर्यादित उपलब्धतेची समस्या. यामुळं अनेकदा इच्छा असूनही तुम्ही पुस्तकांपर्यंत आणि पुस्तकं तुमच्यापर्यंत पोचू शकत नाहीत. मी मघाशी म्हटल्याप्रमाणे, त्या विकसनशील किंवा अविकसित देशांत हे प्रामुख्यानं दिसून येतं; पण दुसरा जास्त गंभीर प्रश्‍न आहे, तो ‘वाचनेच्छेच्या दारिद्रया’चा...! इंग्लिशमध्ये याला ‘पॉवर्टी ऑफ एक्‍स्पेक्‍टेशन्स’ म्हणतात. ‘मी वाचन करायला हवं, माझ्या वैचारिकवाढीसाठी अन्‌ विकासासाठी ते आवश्‍यक आहे,’ अशी धारणाच न होणं आणि तशी इच्छाच नसणं, हे वाचन संस्कृतीच्या वृद्धीसाठी घातक आहे. आज जगभरात अनेक ठिकाणी अशी स्थिती निर्माण झाली आहे. हे म्हणजे, साधनं उपलब्ध आहेत; पण ती वापरण्याची इच्छा नाही, असंच झालं ना...? हे बदलायला हवं. महत्त्वाचं म्हणजे येत्या काळात वाचन हे फक्त अभिरुचीपुरतं मर्यादित न राहता ते एक गरज म्हणून पुढं येणार आहे. त्यासाठी शिक्षणाच्या मार्गानं जायला आपण सज्ज राहायला हवं. वाचन, शिक्षण आणि उन्नयन ही त्रयी परस्परावलंबीच असते.
प्रश्‍न : वाचन आणि लेखन या प्रक्रियांकडे तुम्ही एकत्रितपणे (आणि स्वतंत्रपणेही) कसं पाहता?
उत्तर : खरंतर हे ‘एकापाठोपाठ दुसरा’ असे त्या अर्थानं विकासाचे टप्पे आहेत. त्यांच्याकडं नुसतं प्रक्रिया म्हणून नाही बघून चालायचं. म्हणजे ते म्हणतात ना, चांगलं बोलण्यासाठी चांगलं ऐकलं जायला हवं, चांगलं वाचता येण्यासाठी चांगलं बोलता यायला हवं आणि चांगलं लिहिता येण्यासाठी चांगलं वाचलं जायला हवं. हे एखाद्या ‘ट्रान्समिशन बेल्ट’सारखंच आहे. एकदा हे सुसूत्रपणे झालं, की मग तुम्ही हव्या त्या शैलीत लिहू लागता. मी याला संश्‍लेषणाची प्रक्रिया म्हणेन.
प्रश्‍न : लहान मुलांसाठी होणारं लेखन आणि विशेषतः अलीकडं जे साहित्य बाल-कुमारांसाठी म्हणून खास लिहिलं जातंय, त्याविषयी तुमची काय निरीक्षणं आहेत...? हा काळ बाल-कुमार साहित्याच्या स्थित्यंतराचा आहे, असं वाटतं का?
उत्तर : एकाच शब्दात सांगू का...? ‘गोल्डन एज’! सध्याचा काळ म्हणजे बाल-कुमार साहित्यासाठी सुवर्णपर्वच होय ! या वयातल्या मुलांसाठी कधी नव्हे ते बहुअंगी लेखन होतंय. २० वर्षांपूर्वी अशी स्थिती नव्हती. ‘यंग-ॲडल्ट’ हा एक नवा साहित्य प्रकारच (जॉनर) समकालीन लेखनात आता रूढ झाला आहे. पूर्वी तो असा कुठं दिसून यायचा...? म्हणूनच मुलांच्या दृष्टीनं हा काळ महत्त्वाचा आहे. गंमत म्हणजे हे लेखन मोठ्यांनाही तेवढंच आवडत असल्याचंही जगभरातल्या अनेक उदाहरणांमधून दिसून आलंय. हा काळ या जॉनरच्या वाढीसाठी अतिशय पोषक आहे.
प्रश्‍न : मुलं आज-काल फार काही वाचत नाहीत, अशी ओरड होते. त्याविषयी...?
उत्तर : कोण म्हणतं, मुलं वाचत नाहीत म्हणून? मुलं वाचतात...मनापासून वाचतात! त्यांना वाचायला चांगलं साहित्य हवंय! कदाचित काही ठिकाणी ही मुलं पुस्तकं नसतील वाचत; पण ती त्यांच्या स्मार्टफोनवर वाचताहेत, त्यांच्या ‘किंडल’वर वाचताहेत, कॉम्प्युटरवर वाचताहेत. हे अगदी क्षणाक्षणाला घडतंय. आपल्याला नक्की काय वाचायचंय आणि ते कुठं मिळेल, हे ते शोधू शकत आहेत. महत्त्वाचं म्हणजे, ही नवी माध्यमं अभ्यासासाठी आणि अनेक प्रश्‍नांची उकल करण्यासाठीही वापरली जात आहेत.
प्रश्‍न असलाच, तर तो जी मुलं आपला बराचसा वेळ अनेकदा केवळ सोशल साइट्‌सवर घालवतात त्यांचा आहे. ही मुलं आणि ज्यांच्याकडं वाचनाची साधनंच नाहीत, अशी मुलं या दोघांत फारसा फरक नाही!
प्रश्‍न : मग येत्या काळात मुद्रित पुस्तकं बंद होऊन फक्त अशी डिजिटल पुस्तकंच राहतील का...? कॉम्प्युटर आणि मोबाइल-किंडल आवृत्त्यांची?
उत्तर : डिजिटायझेशन वाईट नक्कीच नाही; पण पुस्तकांसाठीचा तो काही एकमेव पर्यायही नक्कीच नाही. काही वर्षांपूर्वी किंडल आलं तेव्हा अनेकांना वाटलं होतं, की आता कागदी पुस्तकं हातात घेऊन वाचायचा काळ संपला; पण झालं का तसं? नाही. उलट, अलीकडं तर आमच्या ब्रिटनमध्ये लोक पुन्हा मुद्रित पुस्तकांकडं वळू लागल्याचं पाहायला मिळतंय. हेच चित्र जगभर आहे. पुस्तकं हातात घेऊन वाचायला लोकांना आवडतं. मुद्रित पुस्तकांना मरण नाही, पुढंही नसेल. त्यांचं अस्तित्व टिकून राहील, हे माझं ठाम मत आहे. मुळात, जेव्हा अशी काही संकटं आपल्यापुढं येतात, तेव्हा त्यातूनच नव्या संधीही पुढ्यात येत असतात, हे लक्षात घ्यायला हवं.
प्रश्‍न : आजकाल ‘ऑनलाइन पब्लिशिंग’चं प्रमाण वाढलंय. प्रकाशनाचं एक खुलं व्यासपीठ म्हणून त्याकडं पाहता येईल का?
उत्तर : याचं उत्तर मी चटकन ‘हो’ असं कदाचित नाही देऊ शकणार. लोकांना आपलं लेखन विविध माध्यमांतून ‘एका झटक्‍यात ऑनलाइन प्रकाशित’ करून मिळणं, हे त्यांच्यासाठी नक्कीच चांगलं आहे; पण या विषयाची दुसरीही एक गंभीर बाजू आहे व ती म्हणजे त्या लेखनाच्या संपादनाची! तुम्ही तुमच्या मते कितीही चांगलं लिहित असाल, तरी त्याचं संपादन व्हायला हवं की नको...? एका ठराविक गुणवत्तेच्या कसोटीवर ते लेखन ताडून पाहायला हवं की नको...? नेमका हाच ‘चेक पॉइंट’ या ऑनलाइन पब्लिशिंगमध्ये नसतो, म्हणूनच मला त्याची काळजी वाटते! इथं ‘कुणीही या आणि लेखक बना’ असा प्रकार असतो. मुद्रित पुस्तकांच्या प्रकाशन संस्थांमध्ये ज्याप्रकारे किमान क्वालिटी कंट्रोल असतो, तसाच तो इथंही असायला हवा. योग्य निवडीसाठी संपादक हा हवाच!
‘ऑनलाइन पब्लिशिंग’चा अजून एक धोका म्हणजे, त्यातून ‘जे विकतं तेच खपतं’ या प्रकाराला खतपाणी मिळतं. हे म्हणजे, इतर न खपणाऱ्या पण महत्त्वाच्या असलेल्या विषयांवर अन्याय करण्यासारखंच नाही का...?
प्रश्‍न : नव्या लेखकांना काय सांगाल?
उत्तर : मनाला भावेल त्या विषयाला हात घाला! बिनधास्त होऊन लिहा. आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपा आणि विषयाला थेट भिडा, मग तुमचं लेखनही वाचकाला जाऊन भिडेल!
------------------------------------------------------------------------
कार्यकर्ता ‘ग्रंथालय चळवळीचा’
‘ग्रंथालयं म्हणजे समाज संकृतीच्या धमन्याच आहेत,’ असं ॲलन गिबन्स यांना वाटतं. ‘ग्रंथालयं वाचवा’ची हाक देत त्यांनी ब्रिटनमध्ये शब्दशः चळवळ उभारली व ‘पुस्तकांचा आवाज’ दूरपर्यंत पोचवला. ग्रंथालयांचं टिकणं म्हणजे सध्याच्या यांत्रिक काळात ‘माणसा’चं अस्तित्व टिकण्यासारखं असल्याचंही मत ‘लायब्ररी ॲक्‍टिव्हिस्ट’ या नात्यानं त्यांनी आवर्जून नमूद केलं. ते म्हणतात, ‘सामान्य लोकांना विकास प्रवाहात आणण्याच्या प्रक्रियेतला ग्रंथालयं हा महत्त्वाचा भाग आहे, हे नाकारून चालायचं नाही. ग्रंथालयं म्हणजे फावल्या वेळेत करण्याचा उद्योग नव्हे, ती सामाजिक गरज आहे.

No comments:

Post a Comment