भांडारकर संस्थेचा पुढाकार : ५0 हजार पुस्तकांचे होणार डिजिटायझेशन
| ||||||
आपली संस्कृती तसेच तीमध्ये असणार्या भाषांची माहिती येणार्या पिढीला व्हावी, यासाठी भांडारकर संस्थेमध्ये एक संग्रहालय उभारण्यात येणार आहे. यामध्ये दुर्मिळ वस्तू, ग्रंथ यांबरोबरच सर्वसामान्यांची जिज्ञासा जागृत व्हावी, यासाठी दृक्श्राव्य व्यवस्थाही उपलब्ध करण्यात येणार आहे. हा प्रकल्प १00 ते १२५ कोटींचा असून, त्यासाठी केंद्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडे प्रस्ताव दिला आहे. याबरोबरच, हस्तलिखितांचे एक दालन व डॉ. रा. ना. दांडेकर यांचेही स्वतंत्र दालन करण्यात येणार आहे.
- भूपाल पटवर्धन, अध्यक्ष, कार्यकारी मंडळ, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था पुणे : भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेतील भाषा आणि संस्कृतीशी निगडित पुस्तके आता अभ्यासक व वाचक यांना ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत. त्यादृष्टीने काम सुरू झाले असून, पहिल्या टप्प्यात संस्थेतील ४0 ते ५0 हजार पुस्तकांचा ठेवा डिजिटल रूपात उपलब्ध होणार आहे. संस्थेत सध्या १ लाख ३0 हजारांहून अधिक दुर्मिळ व ऐतिहासिक ग्रंथ आहेत. त्यांपैकी ४0 ते ५0 हजार पुस्तकांच्या प्रतींचे पुनर्मुद्रणच झालेले नाही. त्यामुळे ही पुस्तके सर्वांसाठी खुली व्हावीत, यासाठी संस्थेच्या वतीने डिजिटायझेशनच्या कामासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. उद्योगपती जितेन गजारिया यांनी १५ लाखांचा स्कॅनर संस्थेला भेट दिला असून, र्जमनीतून तो येत्या १५ दिवसांत संस्थेत दाखल होईल. त्यानंतर या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल. अशा प्रकारच्या आणखी २ स्कॅनरची संस्थेला आवश्यकता असून, ते मिळाल्यास हे डिजिटायझेशनचे काम लवकरात लवकर पूर्ण करता येऊ शकेल, असे भांडारकर संशोधन संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पटवर्धन म्हणाले, ''संस्थेतील कोणतेही पुस्तक बाहेर घेऊन जाण्याची परवानगी नसल्याने अनेक जणांना येथील ग्रंथसंपदेचा लाभ घेता येत नाही. त्यादृष्टीने हा डिजिटायझेशनचा प्रकल्प निश्चितच आशादायक ठरणार आहे.'' संस्थेला राज्यातील विविध संस्था व व्यक्ती आर्थिक साह्य करीत असल्याने या प्रकल्पासाठी शासनाची मदत घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याविषयी प्रभारी ग्रंथपाल मेघना देशपांडे म्हणाल्या, ''पहिल्या टप्प्यातील ४0 ते ५0 हजार पुस्तके म्हणजे २५ ते ३0 लाख पाने ई-लायब्ररीच्या स्वरूपात उपलब्ध होतील.'' ही पुस्तके पीडीएफ फॉरमॅटमध्ये असतील व वाचकांना सशुल्क उपलब्ध करून दिली जातील, असे भांडारकरचे मानद सचिव डॉ. श्रीकांत बहुलकर म्हणाले. (प्रतिनिधी)
|
No comments:
Post a Comment